कुख्यात गुंड अरूण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. काही महिन्यांपूर्वीच पत्नीच्या आजारपणामुळे गवळीला संचित रजा देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा कमी कालावधीचा पॅरोल मंजूर केला आहे.
अरुण गवळीच्या मुलाचं 17 नोव्हेंबरला लग्न आहे. यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करण्यात आला होता. यावर अरुण गवळीने पोलिसांच्या सुरक्षा कड्यामध्ये जावे, हा खर्च गवळी यानेच करावा, अशी मागणी पोलिसांनी केली होती. यावर कोर्टाने गवळीला पॅरोल मंजूर करताना पोलिसांच्या सुरक्षेशिवाय जाण्याची परवानगी दिली आहे.
मे 2020 मध्ये लॉकडाऊन शिथील केलेला असताना अरुण गवळीच्या मुलीचं लग्न होतं. तेव्हा देखील गवळीला पॅरोल देण्यात आला होता. हे लग्न 29 मार्चला होणार होते मात्र लॉकडाउनमुळे हे लग्न रद्द करावं लागलं होतं. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्षय वाघमारे याच्याशी योगिता गवळीचे लग्न झालं होतं.
दरम्यान, अरुण गवळी याआधीही 3 ते 4 वेळा जेलबाहेर आला आहे. मुलाचं लग्न, आजारपण अशी कारणं देत अरुण गवळी जेलबाहेर आला होता.