वि. दा. सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनीही राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना थेट माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरच निशाणा साधला होता. याला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जर सावकर विज्ञाननिष्ठ होते, असं आपण म्हणतो तर त्या विज्ञाननिष्ठेच्या वाटेने देशाला पुढे नेण्याचं काम नेहरूंनी केलं आहे. अन्यथा या देशाचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. धर्मांध राष्ट्र म्हणून पाकिस्तानची आज अवस्था आहे, तशी आपली अवस्था होऊन दिली नाही म्हणून हा देश नेहरूंचा ऋणी राहील, असं संजय राऊत म्हणालेत.
सावरकरांविषयी सुरू असलेल्या वादंगात आता भरपूर वाद-प्रतिवाद झाला आहे. आमच्यासाठी सावरकरांसह महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू हे सगळे नेते प्रिय आहेत, असं त्यांनी म्हटलंय.
स्वातंत्र्यसैनिक हे कोणत्या एका पक्षाचे नसतात. तेव्हा नेमकं काय घडलं होतं, याबाबतचं स्पष्टीकरण देण्यासाठी ते आता हयात नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांनी कोणावरही चिखलफेक करू नये, असं आवाहनही राऊत यांनी केलं आहे.