शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार असून ठाकरे गटासोबत वंचित बहुजन युती करणार हे निश्चित झाले आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांचा वंचित एकत्र येणार आहे. भाजपविरोधात ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडी युती करणार असून, ‘वंचित’कडून यासाठी होकार देण्यात आल्याची माहिती वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे काही दिवसांपूर्वी एका मंचावर आले होते, त्यानंतर युतीच्या चर्चांना उधाण आले होते..
रेखा ठाकूर यांनी म्हटले की, शिवसेना नेते सुभाष देसाई हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना येऊन भेटले. त्यांच्यातही दोन बैठका झाल्या असून, युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली आहे. वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडीत समाविष्ट करून चार पक्षीय आघाडीतून निवडणूक लढवणार की शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच निवडणूक लढवणार हे शिवसेनेने स्पष्ट करावे अशी मागणीदेखील वंचितकडून करण्यात आली आहे. या बाबतीतला निर्णय त्यांच्याकडून समजला की पुढच्या टप्प्याची चर्चा सुरु होईल असेही रेखा ठाकूर यांनी म्हटले. त्यामुळे आता वंचितने आता युतीबाबतच्या निर्णयाचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात गेला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व वैदिक नसून ते मान्य असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. शिवसेनेसोबत युती करण्यासाठी काहीही हरकत नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईत प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याला अर्पण करण्यात आलेली, प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीबाबत सकारात्मक संकेत दिले होते.