विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात शिक्षकांचा बदली घोटाळा समोर आलाय. सोईनुसार बदली मिळावी म्हणून शिक्षकांनी खोटी कारणं आणि त्यासाठी खोटे दाखलेही सादर केल्याचं समोर आलंय.
पुणे तिथे काय उणे, विद्येचं माहेरघर असं पुण्यासाठी अभिमानानं म्हटलं जातं, पण आता पुण्यात शिक्षकांचा चक्क बदली घोटाळा समोर आलाय. हव्या त्या शाळेत पोस्टिंग मिळावी किंवा सोईनुसार नियुक्ती मिळावी यासाठी शिक्षकांनी बोगस दाखले सादर केल्याचं समोर आलंय. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शस्त्रक्रिया, अपघात, घटस्फोट असे बनावट दाखले सादर केलेत, इतर शिक्षकांच्या तक्रारीवरुन हा बदली घोटाळा समोर आलाय.
सुजाण आणि प्रामाणिक नागरिक घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते, असं आपण लहानपणापासून ऐकत असतो. पण सोईच्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी किंवा बदलीच होऊ नये यासाठी काही शिक्षकांकडून बनावट दाखले देण्याचा जो प्रकार घडलाय त्यामुळे जनाची नाही पण मनाची तरी लाग बाळगा अशा प्रतिक्रिया उमटतायत. शिक्षकांकडूनच असे प्रकार घडणं शिक्षण क्षेत्रासाठी चिंताजनक आहे.