महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पेटला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोमईंनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असं म्हटलं होतं. यावरून राज्यातील वातावरण तापलेलं आहे, याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्य सरकारला जमत नसेल तर तसं सांगावं. सरकार चालवण्यापासून बेळगावात जाण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. सीमा विभागातील गावं पळवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला असून सरकामधील काही मंत्री कर्नाटकला जाणार होते. मात्र तिथल्या मुख्यमंत्र्यांनी येऊ नका असा इशारा दिल्यावर नेभळट मंत्र्यांनी दौरा रद्द केल्याचं ठाकरे म्हणाले.
राज्य सरकारने त्या गावांची जबाबदारी घ्यावी, गद्दार सरकार याबाबत काय करणार आहे ते सांगावं नाहीतर माझी सरकार चालवण्यापासून ते बेळगावला जाईपर्यंतची सर्व जबाबदारी आम्ही घेत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी थेट शिंदेवर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरेंचं हे चॅलेंज शिंदे स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महामोर्च्याची हाक दिली आहे.
“या महामोर्च्याला 17 डिसेंबरला सकाळी 10 वाजता जिजामाता उद्यान भायखळा इथून सुरुवात होईल. तर आझाद मैदानात मोर्च्याची सांगता होईल. या महामोर्च्यात महाराष्ट्रप्रेमींनी सहभागी व्हावं”, असं आवाहन ठाकरे यांनी केलं.