चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या गेटवरच एका तरुणीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. मंगळवारी सकाळच्या वेळेस ही घटना उघडकीस आल्याने सदर परिसरात एकच खळबळ माजली.
पौर्णिमा मिलिंद लाडे ( 27 ) असं मृतक तरुणीचं नाव असून, ती गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव (चोप) गावची मूळ निवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, सदर घटनेची माहिती माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपासाची सूत्र हाती घेतली. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार ज्याच्याशी लग्न ठरलं त्याच नवरदेवानं साखरपुडा झाल्यावर लग्नास नकार दिल्याने तिनं हे टोकाचं पाऊल उचललं.
ब्रह्मपुरी शहरात न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम अद्यापही सुरूच आहे. अशातच न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरत मुलीने आयुष्य संपवल्यानं शहरात चर्चांना पेव फुटले आहेत. अद्यापही सदर प्रकरणी कोणावरही कारवाई करण्यात आली नसली, तरीही या प्रकरणात नेमकं दोषी कोण हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.