बॉलिवूडचा खिलाडी कुमार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकणार, ही बातमी समोर आल्या क्षणापासूनच संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. शिबवा आणि अक्षय कुमार? काही साम्य तर आहे का असे प्रश्नही अनेकांनीच विचारले. बरं, तेही पचवत तो या रुपात कसा दिसतो याची प्रतीक्षा केली. पण, आता ही प्रतीक्षा काही या मंडळींना फारशी फळलेली दिसत नाही. अक्षय कुमारनं नुकताच त्याच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील फर्स्ट लूक चाहत्यांच्या भेटीला आणला. सोशल मीडियाच्या माध्यमातून जय भवानी, जय शिवाजी! अशा जयघोष करत त्यानं हे रुप चाहत्यांसमोर सादर केलं.
साजेसं पार्श्वसंगीत, योग्य वेशभूषा आणि केशभूषा असूनही त्याचा हा लूक मात्र चाहत्यांच्या पचनी पडला नाही. काहींनी आधी महाराजांसारखं चालायला शिक, नीट चाल असं म्हणत त्याला हिणवलं. तर, काहींनी टीझरमधील एक अशी गोष्ट हेरली, ज्यावरून आता खिलाडी कुमार आणि या चित्रपटाची संपूर्ण टीम टिकेची धनी होताना दिसत आहे.
फर्स्ट लूकच्या निमत्तानं सादर करण्यात आलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये अगदी शेवटी शेवटी खिलाडी कुमारचा महाराजांच्या रुपातील चेहरा जवळून पाहायला मिळतो. पण, त्याचवेळी लक्ष जातं ते म्हणजे त्याच्या बरेबर मागे, वरील बाजूस असणाऱ्या एका झुंबरकडे. साधारण शिवकालीन दिवसांमध्ये विद्युत रोषणाई वगैरे गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या. अशा वेळी दिवे, मशालींचा वापर सर्रास होत होता. पण, मग या चित्रपटात हा बल्ब असणारा झुंबर आलाच कसा? हाच प्रश्न नेटकऱ्यांना पडला.
अल्बर्ट आईन्स्टाईन काय महाराजांच्या आधी जन्मला होता का? अशी प्रतिक्रियाही काही नेटकऱ्यांनी दिली. हे दृश्य किंवा चित्रपटाची पहिलीच झलक पाहिल्यानंतर इथं घेतलेल्यी Cinematic Liberty पाहता आता चित्रपटामध्ये आणखी काय काय पाहायला मिळणार? असा खोचक प्रश्नही काहींनी केला.