पुरूषप्रधान संस्कृती ते स्त्री-पुरूष समानता असा मोठा प्रवास आपल्या समाजाने केलाय. आजच्या काळात स्त्री आणि पुरूष खांद्याला खांदा लावून या जगात वावराताना दिसतात. पण या जगातून पुरूषच गायब झाले तर काय होईल याचा कधी विचार केलाय का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? पण विचार करायला भाग पाडणारी ही गोष्ट कदाचित आपलं भविष्य आहे. फक्त बोलायचं म्हणून नाही पण हा धक्कादायक खुलासा एका संशोधनातूनच झाला आहे.
एक काळ होता जेव्हा स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी, जास्तीत जास्त मुली जन्माला याव्या यासाठी अनेक प्रयत्न केले जात होते. पण आता संशोधनातून अशी धक्कादायक माहिती समोर येतीये की भविष्यात फक्त महिलाच उरतील आणि पुरूष पूर्णपणे विलुप्त होतील. ही माहिती समोर आली अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. पुरूषच नष्ट झाले तर माणसाचा वंश पुढे कसा जाणार? जीव कसा जन्माला येणार? कारण वंश पुढे नेण्याचं काम हे स्त्री आणि पुरूष दोघांचंपण असतं. पण मुलांचा जन्म होण्यासाठी पुरूषांमध्ये जे वाय गुणसूत्र गरजेचे असतात तेच आता नष्ट होत चालल्याने जगभर खळबळ उडालीये.
वाय गुणसूत्र किंवा वाय क्रोमोजोम्समध्ये अनेक नॉन कोडिंग डिएनए असतात. वाय क्रोमोजोम हे आकाराने एक्स क्रोमोजोमपेक्षा लहान असतात. मात्र, तरी गर्भात विकसतीत होणारं बाळ हे मुलगी आहे की मुलगा हे वाय क्रोमोजोममुळेच ठरतं. वाय क्रोमोजोममध्ये साधारण 55 जीन असतात. मात्र, वाय क्रोमोजोम्सची हीच संख्या गेल्या जवळपास 16 कोटी वर्षांमध्ये 900 जीनवरून कमी होत होत आता 55 वर आलीये. पृथ्वीवरील जवळपास सस्तन प्राण्यांचं जेंडर हे वाय क्रोमोजोमच्या पुरूष निर्धारित जीनद्वारेचं निश्चित होतं.
मात्र, आता काही कारणांमुळे पुरूषांमधले हेच वाय गुणसूत्र कमी होत असल्याचं अभ्यासातून समोर आलंय. प्रोसिडिंग ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स जर्नलमध्ये या बाबातचा एक रिसर्च पेपर प्रसिद्ध झालाय. पुरूषांमधले वाय गुणसूत्र सध्या कमी असले पण कालांतराने ते पूर्णपणे नाहीसेही होऊ शकतात, अशी भीतीही शास्त्रज्ञांनी वर्तवलीये.
पुरूषांमधले वाय क्रोमोजोम जर कमीच होत राहिले तर अशा परिस्थितीत मुलगा जन्मालाच येणार नाही आणि परिणामी यामुळे पृथ्वीतलावरून माणूसच नष्ट होईल. शास्त्रज्ञांचा असाही दावा आहे की जर आपण वेळेत नवीन सेक्स जीन विकसित केले नाही तर आपण नामशेष होऊ शकतो. अर्थात हे होण्यासाठी हजारो लाखो वर्षे लागू शकतात.
पण पुरूषांमध्ये सातत्यानं वाय क्रोमोजोम कमी होणं याचाच अर्थ आपण त्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत, ज्या जोडप्यांना मुलगा पाहिजे यांच्यासाठी ही नक्कीच टेंशन वाढवणारी बातमी आहे. मात्र, वाय क्रोमोजोम जर संपले तर पुरूष जात खरंच संपुष्टात येणार की या गुणसुत्रांच्या जागी कोणते नवे गुणसूत्र विकसीत होणार याबाबत मात्र सध्या तरी काही सांगता येणं अवघड आहे.