महिलांच्या सुरक्षेबाबतचे कायदे आता अधिक कठोर होत आहेत. बलात्काराच्या घटना वाढू लागल्या असल्या तरी समाजही आता जागा होत आहे. अशातच फ्रेंच ऑस्कर म्हणून ओळख असलेल्या सीझर अवॉर्डच्या आगामी सोहळ्यासाठी एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामुळे फ्रेंच चित्रपटसृष्टी महिलांच्या बाजूने उभी आहे असे दिसून आले आहे.
फेब्रुवारी २०२३ मध्ये होणार्या सीझर पुरस्कार सोहळ्यात बलात्काराचे आरोपी अभिनेते आणि दिग्दर्शकांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. फ्रेंच अभिनेता सोफियाने बेनेसर हा बलात्काराचा आरोपी असल्यामुळे त्याच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात आला आहे.
सोफियाने बेनेसर हा प्रसिद्ध फ्रेंच अभिनेता आणि मॉडेल आहे. त्याच्यावर बलात्काराचे दोन आरोप असून त्याची चौकशी सुरु आहे. तसेच आपल्या पार्टनरला मारहाण केल्याचा देखील आरोप त्याच्यावर आहे. मागच्या वर्षी सोफियाने या अभिनेत्यावर आणखी काही महिलांनी बलात्कार व मारहाण केल्याचा आरोप केला होता. महत्वाचं म्हणजे तो केवळ २५ वर्षांचा आहे आणि इतक्या तरुण वयात यश आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याच्यावर असले गंभीर आरोप झाले आहेत.
२०१९ मध्ये म्हणजे तीन वर्षांपूर्वी सोफियाने याच्यावर आणखी एका अभिनेत्रीने बळजबरी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. परंतु सोफियाने म्हणतो की त्याच्यावर लागलेले सर्व आरोप निराधार आहेत. सोफियाने हा फ्रेंच तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. त्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात रंगमंचापासून केली. त्यानंतर त्याने ‘ला स्टॅगिएरे’ या मालिकेत काम केले. “दिस म्युजिक डज नॉट प्ले फॉर एनिवन” या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाची जादू लोकांना दाखवली. पुढे त्याला लेस “अमॅंडियर्स” या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तो फ्रांसचा सुपरस्टार झाला. त्याला सीझर पुरस्कार देखील मिळणार होता. परंतु त्याच्यावर बलात्काराचे आरोप झाले आणि आता आयोजकांनी कठोर निर्णय घेतले असल्यामुळे आता त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
फ्रांसच्या सीझर पुरस्काराच्या आयोजकांनी घेतलेला निर्णय स्तुत्य आहे असे म्हणावे लागेल. परंतु भारतात मात्र गंभीर आरोप असलेले अभिनेते सुपरस्टार बनून सिनेसृष्टीवर राज्य गाजवत असतात. भारतीय सिनेसृष्टीने फ्रांसकडून आदर्श घेण्याची गरज आहे.