• मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी होताच मुश्रीफ समर्थकांनी त्यांच्या घरासमोर जमून राज्य सरकार, केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
ईडी आणि आयकर विभागाने एकत्रित कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी माहिती घेऊन बोलतो, एवढीच प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झालाच नसल्याचं हसन मुश्रीफ यापूर्वी वारंवार सांगत होते. मात्र, आता ईडी आणि आयकर विभागाने एकत्रित छापेमारी केल्याने मुश्रीफ यांनी मोजकीच प्रतिक्रिया देऊन या विषयावर बोलणं टाळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेची माहिती घेऊनच मुश्रीफ बोलणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी आणि आयकर विभागाने आज पहाटे साडे सहा वाजता छापेमारी केली. त्यामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मुश्रीफ यांनी घोटाळा केला असून जावयाला आर्थिक लाभ मिळवून दिल्याची प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी माहिती घेऊन बोलतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुश्रीफ आता पुढची काय पावलं उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आज सकाळीच ईडी आणि आयकर विभागाच्या 20 अधिकाऱ्यांनी कागलमधील मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी केली. सकाळपासूनच ही छापेमारी सुरू आहे. अनेक महत्त्वाची कागदपत्रे तपासली जात आहेत. तसेच मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांना काही सवालही केले जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी होताच मुश्रीफ समर्थकांनी त्यांच्या घरासमोर जमून राज्य सरकार, केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुश्रीफ यांच्या घराबाहेर जमत आहेत. त्यामुळे मुश्रीफ यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच कुणालाही मुश्रीफ यांच्या घराच्या परिसरात येण्यास मनाई केली जात आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात आम्ही मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे दिली होती. पण हा घोटाळा दाबण्यात आला होता. आता हे प्रकरण पुन्हा उजेडात आलं असून त्यानुसार कारवाई झाल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
मुश्रीफ यांनी आपल्या जावयाच्या कंपनीला 1500 कोटीचं कंत्राट दिलं होतं. त्यामुळे मुश्रीफ यांच्या जावयाला आर्थिक लाभ मिळाला होता. त्याचीही चौकशी होत असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.