कर्नाटकात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवेळी एक व्यक्ती SPG चे सुरक्षा कडे भेदून जवळ पोहोचली होती. सुरक्षा रक्षकांनी त्याला तत्काळ दूर नेले. आता पोलीस आयुक्तांनी अशी माहिती दिली की, पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही चूक झालेली नाही. या घटनेचा एक व्हिडीओसुद्धा समोर आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर राहून लोकांचे अभिवादन स्वीकारत होते. तेव्हा एक व्यक्ती वेगाने त्यांच्या दिशेने आली. तिच्या हातात हार होता. तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तत्काळ त्या व्यक्तीला बाजूला केले आणि पंतप्रधान मोदींचा रोड शो पुढे गेला. पोलिसांकडून यावर स्पष्ट करण्यात आले आहे की, सुरक्षेत कोणतीही त्रुटी नव्हती, याला सुरक्षा भेदली असे म्हणता येणार नाही. परंतु सुरक्षा तज्ज्ञांनी मात्र ही घटना अतिशय गंभीर असल्याचे मत व्यक्त केले आहे.
• राष्ट्रीय युवा महोत्सवात पंतप्रधानांची उपस्थिती
यंदा हुबळीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची थीम ‘विकसित युवा, विकसित भारत’ अशी आहे. भारतात या महोत्सवाची सुरुवात 1984 मध्ये झाली होती. त्यानंतर दरवर्षी 12 जानेवारीला देशात राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी कर्नाटकात पोहोचले आहेत.