• चौघेही एकाच कुटुंबातील
एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये पती- पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. शेअर मार्केटमध्ये मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करण्यात येत आहे.
दिपक थोटे (59) इंदू दिपक थोटे ( 45) मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (24) मुलगी समीक्षा दिपक थोटे (17) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. दोन महिन्यांपूर्वी ते केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते.
पुण्यातील मुंढवा परिसरात दिपक थोटे यांचे कुटुंब राहत होते. पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा संसार होता. ते मुळचे अमरावतीचे असून दोन महिन्यांपूर्वी ते केशवनगर येथे वास्तव्यास आले होते. आर्थिक नुकसानीतून या चौघांनीही विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेजारी राहणारे डॉक्टर दौलत पोटे यांना थोटे यांच्या घराचा दरवाजा बंदच असल्याने संशय आला. त्यांनी याबाबत केशवनगर पोलीस ठाण्यात कळवले. पोलिसांनी तातडीने धाव घेत दरवाजा तोडला. पोलिसांना चौघांचे मृतदेह सापडले. चौघांचेही मृतदेह वैद्यकीय तपासणीकरता ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, शेअर बाजारात आर्थिक नुकसान झाल्याने ही सामूहिक आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.