मी काॅंग्रेसला खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. काॅंग्रेस आणि शरद पवार यांना चांगल्याप्रकारे ओळखणारा राज्यात दुसरा नेता नाही. ते तुम्हाला फसवतील. शिवसेनेने त्यांच्यासाठी थांबू नये, असा इशारा आम्ही उद्धव ठाकरेंना दिला आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीमध्ये आमची शिवसेनेशी युती झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी युतीचा अंतिम निर्णय घ्यायचा आहे. मात्र, युती कधी जाहीर करायची, ते ठाकरे यांनी ठरवायचे आहे. ठाकरे यांना काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसला सोबत घ्यायचे आहे. आपण एकत्र पत्रकार परिषद घेऊ, असे ठाकरेंनी सांगितल्याचे आंबेडकर म्हणाले.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत युतीची चर्चा सुरु असतानाच आंबेडकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने आंबेडकर- शिंदे युतीची चर्चा सुरु झाली. मात्र, ही भेट इंदू मिल येथील डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात होती, असे सांगत आंबेडकर यांनी शिंदेंसोबतच्या युतीला पूर्णविराम दिला. आगामी निवडणुकांत उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.