केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त समोर आले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने तीन वेळा फोन आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नितीन गडकरींच्या नागपूर कार्यालयाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
माहितीनुसार, आज सकाळपासून तीन वेळेला नितीन गडकरींच्या ऑरेंज सिटीजवळील जनसंपर्क कार्यालयात फोन आले. सकाळी ११.३० वाजल्याच्या सुमारास दोन वेळेला आणि १२.३२ वाजता असे तीन वेळेला धमकीचे कॉल आले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या फोनमध्ये दाऊद असा शब्द उच्चारण्यात आला होता. खंडणीची मागणी करण्याचा आशय त्या फोनमध्ये होता. जर खंडणी दिली नाही, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारू, अशी धमकी फोनद्वारे देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान या धमकीच्या फोनबाबत तातडीने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नागपूर वरिष्ठ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर नागपूरच्या सायबर सेलला माहिती दिल्यानंतर गडकरींच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून या फोनसंदर्भात अधिक तपास केला जात आहे. माहितीनुसार, आज नितीन गडकरी नागपूरत असून सध्या ते एका कार्यक्रमात आहेत. त्याठिकाणी पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत चोख बंदोबस्त केला आहे.