संक्रांतीच्या निमित्ताने सर्वांनी पतंगबाजीचा आनंद लुटला. तसेच, सर्वांना तिळगूळ देऊन संक्रांतीचा सण साजरा केला. परंतु या सणाला काही ठिकाणी गालबोट लागले. पतंग उडवताना वापरण्यात आलेल्या मांज्यामुळे अनेक अपघात झाले. राज्यातही नायलाॅन मांजामुळे एका 11 वर्षीय मुलाचा बळी गेला. तर अनेकांना या मांज्यामुळे गंभीर जखमा झाल्या आहेत. तर मध्य प्रदेशात चायनीज मांज्यामुळे भाजप नेत्याला गंभीर दुखापत झाली आहे.
मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये विष्णु पोरवाल या भाजप नेत्याचे नाव असून बाईकवरुन जात असताना त्याच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी विष्णु पोरवाल बाईकने एका कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी अचानक त्यांच्यासमोर चायनीज मांजा आला आणि अडकला. या मांजाने विष्णु यांचे नाक आणि ओठ कापले. यानंतर विष्णु यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. विष्णु यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. डाॅक्टरांनी विष्णु यांना शस्त्रक्रिया करण्यास सांगितले आहे.
• उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू
दुसरीकडे नागपुरात नायलाॅन मांजामुळे एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. नागपुरच्या जरीपटका परिसरात महात्मा गांधी शाळेतून शनिवारी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर मुलगा वडिलांसोबत दुचाकीवरुन घरी परतत होता. त्यावेळी मांज्यामुळे त्याचा गळा चिरला गेला. यानंतर उपचारासाठी मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्राव झाला होता. दरम्यान, रविवारी उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला आहे.