काही दिवसांपूर्वी अयोध्येतील राम मंदिरावर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करण्याची योजना आखत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राम मंदिरावर हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, आत्मघातकी बॉम्बच्या माध्यमातून राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचे समजते. तसेच, ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याचा कट रचल्याचे सांगितले जात असून, दहशतवादी नेपाळमार्गे भारतात आत्मघातकी हल्ल्याची योजना आखत असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतर आयोध्येतील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. येत्या 26 जानेवारी रोजी अयोध्येसह राजधानी दिल्ली आणि पंजाबमध्ये आयडीद्वारे स्फोट घडवून आणले जाऊ शकतात अशीही माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.
• राम मंदिरावर हल्ल्याची दुसऱ्यांदा माहिती
दरम्यान, 10 जानेवारी रोजी देखील अयोध्येतील राम मंदिरावर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लष्कर-ए-तैयबा (LeT) या एकमेव दहशतवादी संघटना आहेत ज्या प्रामुख्याने राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची योजना आखत असल्याचे समोर आले होते. शिवाय, या दहशतवादी गटांनी नेपाळमार्गे दारूगोळा आणि आत्मघाती बॉम्बर आणण्याची योजना आखली असल्याची माहिती समोर आली होती.
• मंदिराचे जवळपास 50 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण
अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या राम मंदिराचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, मंदिराचे जवळपास 50 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. 2023 वर्षाच्या अखेरपर्यंत या मंदिराचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच नव्या वर्षात हे मंदिर सामान्यांसाठी खुले केल जाणार असल्याचे सांगितले जात आहे.