Saturday, October 5, 2024

विधानपरिषदेच्या ५ जागांवर कुणी अर्ज घेतले मागे, कुणामध्ये होणार लढत?

महाराष्ट्रविधानपरिषदेच्या ५ जागांवर कुणी अर्ज घेतले मागे, कुणामध्ये होणार लढत?

विधानपरिषदेच्या ५ जागांवर निवडणूक होत आहेत. त्यासाठी सोमवार, १६ जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे आता पाचही जागांवरील चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि अमरावती येथील निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. सोमवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे.

• नाशकात १६ उमेदवारांमध्ये लढत

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमोल बाळासाहेब खाडे, डॉ. सुधीर सुरेश तांबे, दादासाहेब हिरामण पवार, धंजनय कृष्णा जाधव, राजेंद्र दौलत निकम, धनराज देविदास विसपुते या सहा उमेदवारांनी पदवीधर मतदार संघ निवडणुकीतून माघार घेतली आहे. अर्ज माघारीनंतर नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत तांबे-पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी असतानाही तत्कालीन आमदार सुधीर तांबे यांनी कुटुंबाच्या आग्रहाचे कारण पुढे करून भाजपच्या संपर्कात असलेल्या पुत्र सत्यजित तांबे यांचा अपक्ष काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र काँग्रेस पक्षाने पक्षभंगाची कारवाई केल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात आले. भाजपने देखील ऐनवेळी पर्यंत इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील यांना वेटिंगवर ठेवत अधिकृत उमेदवारी जाहीर केली नाही. त्यांनी देखील अपक्ष फॉर्म भरत रिंगणात उतरल्या. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.

• अमरावतीत खऱ्या अर्थाने चौरंगी लढत

अमरावती पदवीधर निवडणुकीसाठी एका जागेसाठी २३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेवटच्या दिवशी १० उमेदवारांनी आपला अर्ज माघार घेतला. भाजप, माविआ, वंचित आणि आपचे उमेदवार रिंगणात आहेत. पण भाजपचे उमेदवार डॉ रणजीत पाटील आणि माविआचे धीरज लिंगाडे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. आज पासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरवात झाली आहे. ३० जानेवारी रोजी मतदान तर २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

• नागपूरमध्ये सर्वाधिक उमेदवार रिंगणात

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण २७ अर्ज आले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी आज उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता २२ उमेदवार रिंगणात आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे चार उमेदवार म्हणजे नागो गाणार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार आहेत, त्यांना भाजपचा पाठिंबा आहे. तर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले हे निवडणुकीला उभे राहणार आहेत. त्यांना काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांची पसंती असल्याचे बोलले जात आहे. मात्र काँग्रेसने अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही. कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना काँग्रेसचा पाठिंबा मागितला होता. मात्र काँग्रेस नेत्यांकडून आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही असे त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश इटकेलवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भ ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत. यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म मिळालेला नाही.

• कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आठ उमेदवार रिंगणात

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत १३ जानेवारी ते १६ जानेवारी २०२३ या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १३ उमेदवारी अर्जांपैकी ५ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीच्या जाहिर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार ५ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३ या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कालावधीत छाननी दरम्यान एकूण १३ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरवून स्विकृत करण्यात आले होते. त्यापैकी १. वेणुनाथ विष्णु कडू, अपक्ष २. जिमी मतेस घोन्साल्वीस, अपक्ष ३. बळीराम परशुराम म्हात्रे, अपक्ष ४. बाळाराम गणपत पाटील, अपक्ष ५. ज्ञानेश्वर पुंडलिक म्हात्रे, अपक्ष या पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज जागे घेतले आहेत. ज्ञानेश्वर बारकु म्हात्रे, भारतीय जनता पार्टी, २. धनाजी नानासाहेब पाटील, जनता दल (युनायटेड ), ३. उस्मान इब्राहिम रोहेकर, अपक्ष, ४. तुषार वसंतराव भालेराव, अपक्ष, ५. रमेश नामदेव देवरुखकर, अपक्ष ६. बाळाराम दत्तात्रेय पाटील, अपक्ष, ७. प्रा. राजेश संभाजी सोनवणे, अपक्ष, ८. संतोष मोतीराम डामसे, अपक्ष असे आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान सोमवार, ३० जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत या वेळेत होणार आहे.

• औरंगाबादमध्ये १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी एकुण १५ उमेदवारांचे ३० नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले होते. नामनिर्देशनपत्र छाननी नंतर सर्व १५ उमेदवारांचे नामनिर्देशपत्र वैध ठरले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५ उमेदवारांपैकी ०१ उमेदवाराने उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेला अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असताना देखील, राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला अखेर बंडखोरीचा ग्रहण लागल्याचे पाहायला मिळाले.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles